जिल्ह्यतील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक शुक्रवारी (दि. २७) पार पडली. यामध्ये पाच पंचायत समितींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मानवत येथे शिवसेनेने पुन्हा सत्ता काबीज केली असून परभणी पंचायत समिती शिवसेनेने भाजपच्या मदतीने आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले. गंगाखेड पंचायत समितीवर आमदार गुट्टे यांनी वर्चस्व सिद्ध केले तर पालम पंचायत समिती घनदाट मित्र मंडळाने आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले.

जिल्ह्यातील परभणी पंचायत समितीत यापूर्वी काँग्रेसकडे सभापतिपद होते, तर भाजपकडे उपसभापतिपद होते. परंतु यावेळी शिवसेनेने सत्ता काबीज करण्यासाठी भाजपला सोबत घेत पंचायत समिती आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळवले. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागले. जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ या चार पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्वविाद वर्चस्व असल्याने यापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे बहुमत असलेल्या या चारही पंचायत समितीत नव्याने झालेल्या सभापती व उपसभापतिपदी पदासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पूर्णा पंचायत समिती यापूर्वी भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. यावेळी राष्ट्रवादीने राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे सत्तासूत्र अमलात आणत शिवसेनेला जवळ केले. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सभापतिपद आपल्या ताब्यात घेत पंचायत समितीवर वर्चस्व मिळवले. तर शिवसेनेला उपसभापती पदासह सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. मानवत पंचायत समितीत यापूर्वी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा सभापती होता. यावेळीही काँग्रेसची मदत घेत पुन्हा एकदा शिवसेनेने सभापतिपद मिळवले आहे. गंगाखेड पंचायत समितीत रासपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत असतानाही रासपने पुन्हा एकदा पंचायत समितीवर आपला झेंडा रोवण्यात यश मिळवले. पालम पंचायत समितीत घनदाट मामा मित्र मंडळ व राष्ट्रवादीची यापूर्वी युती होती. परंतु शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत घनदाट मित्र मंडळाने भाजपाशी युती करीत पंचायत समिती सभापतिपद आपल्याकडे घेतले तर भाजपला उपसभापतिपद दिले. त्यामुळे राष्ट्रवादीला यावेळी सत्तेपासून दूर रहावे लागले आहे.

जिल्ह्य़ातील सभापती व उपसभापती असे- परभणी – गोकर्णा भानुदास डुबे, प्रमोद वसंतराव गायकवाड, जिंतूर- वंदना गणेश इलग, शरद मस्के, सेलू- सुमनबाई गाडेकर, आनंद डोईफोडे, मानवत- प्रमिला शिवाजी उक्कलकर, कमल शिवाजी िहगे, पाथरी- कल्पना सदाशिव थोरात तर गंगुबाई लक्ष्मण डुकरे, पालम- अलका विजयकुमार िशदे, अण्णासाहेब नारायण किरडे, गंगाखेड- छाया मुंजाराम मुंडे, शांताबाई देवराव माने, सोनपेठ- मीरा बापुराव जाधव, शंकरराव एकनाथराव बचाटे तर पूर्णा पंचायत समिती सभापतिपदी अशोक यादव बोकारे, तर रोहिणी शंकरराव काळे यांची उपसभापतिपदी निवड झाली आहे.