विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबरच्या जागा वाटपात नगरसह कर्जत-जामखेड या दोन जागा पक्षाला मिळाव्यात हा राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. त्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे यांनी सांगितले. हे स्पष्ट करतानाच त्यांनी याच आधारावर इच्छुकांना दोन्ही ठिकाणी प्रचार सुरू ठेवण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. जिल्ह्य़ातील पक्षाची एकही जागा काँग्रेसला सोडली जाणार नसल्याचाही दावा केला.
नगर व कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. नगरमध्ये अनेक वर्षे काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे, त्यामुळे या जागेची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. या जागेसाठी पक्षाकडे महापौर संग्राम जगताप यांच्यासह सातजण इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली. आघाडी करण्यासाठी काँग्रेसकडून चालढकल होत आहे. स्वतंत्र लढल्यास राज्यात राष्ट्रवादीच सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा त्यांनी केला. येत्या दोन दिवसात राज्यातील उमेदवारांची नावे जाहीर होतील, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
माजी आमदार राजीव राजळे पक्षातच आहेत, ते कोठेही जाणार नाहीत. आजच्या बैठकीला त्यांच्या पत्नी व जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे उपस्थित होत्या. त्यांनीही आपल्याशी बोलताना कोठेही जाणार नसल्याचे सांगितले आहे. कदाचित लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून राजीव राजळे पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत नसावेत, असे काकडे यांनी सांगितले. माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पुन्हा पक्षाचे काम सुरू केले आहे. त्यांनी श्रीगोंद्यातून पक्षाकडे उमेदवारीही मागितली आहे. त्यांचे नाव शिर्डी संस्थानच्या विश्वस्तपदासाठी पक्षाने सुचवले आहे, असे काकडे म्हणाले. पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी काकडे यांनी श्रीगोंद्यातील जि. प. च्या माजी सभापती श्रीमती कमल सावंत (श्रीगोंदे) यांची नियुक्ती केली.