भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

“सरकार नाही त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. सुरुवातीला देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं. आमच्या भगिनी मेधा कुलकर्णी, कार्यकर्ते उगाच नाराज झाले,” असं अजित पवारांनी म्हटलं.

“निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामं व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामं घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचं होतं,” असा टोला त्यांनी लगावला.

शेतकरी आंदोलनावरुन टीका-
“आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आमचं आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

भाजपाचे आमदार संपर्कात –
“भाजपाचे आमदार संपर्कात असल्याचं मी म्हटलेलं नाही. काळजी घ्या तुम्ही मागच्या वेळी फोडाफोडी केली…सरकार येणार नाही, आपली कामं होणार नाहीत यासाठी ते गेले. तिथं कामं होत नसतील ते परत दुसरीकडे जातील एवढंच म्हटलं. तीन चार महिन्यात काही गोष्ट घडू शकतात असं म्हटलं तर त्यांना राग आला. त्यांनी इतर पक्षातील आमदार घेताना उकळ्या फुटत होत्या, बरं वाटत होतं…आता कसं वाटतंय तर गार गार वाटू लागलं आहे,” असा चिमटा त्यांनी काढला.

मराठा आरक्षण-
“कोणताही निर्णय घेतला तरी त्यात दोन मतप्रवाह दिसतात. काहीजण निर्णयाचं समर्थन करु शकतात तर काहीजण विरोध करु शकतात. हा ज्याच्या त्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे. जानेवारीत सुनावणी होणार आहे. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकावं यासाठी प्रयत्नशील आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले आहेत –
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

“पुण्यात अनेक नेते घडले आहेत. कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिज. पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.