News Flash
Advertisement

स्वबळाचा नारा देणाऱ्या नाना पटोलेंना अजित पवारांनी फटकारलं; म्हणाले…

हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन, नाना पटोलेंचं सूतोवाच

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२४ च्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगली आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असंही सूतोवाच नाना पटोले यांनी केलं आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवाव्या या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेविरोधात नाना पटोले यांनी भूमिका घेतली असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांना फटकारलं आहे.

कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा आग्रह!

“राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचं त्यांना यावेळी अधोरेखित केलं.

नाना पटोलेंनी काय म्हटलं आहे –

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच २०२४च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

सरकार पाच वर्षे टिकणार -मलिक

मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढविण्याची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली आहे. परंतु पटोले यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त करतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल, असे भाकीत व्यक्त करीत शिवसेना आणि राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे.

नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

“नाना पटोले यांनी त्यांचा पक्ष पुढील निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तसंच पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावं लागतं,” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे, असंही ते म्हणाले तसंच किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी काय म्हटलं होतं

“राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार उत्तम काम करीत आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल आणि पुढील काळातही तिन्ही पक्ष एकत्रितपणे जोमाने काम करतील,” असा विश्वाास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहील, असं सूतोवाच केलं होतं.

21
READ IN APP
X
X