पंढरपूर नगरपालिकेसाठी शासनाकडून जाहीर करूनही थकलेल्या यात्रा अनुदानाबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये बुधवारी प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत हा निधी तातडीने जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यानंतर लगोलग हा निधी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाल्याची माहिती पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनी दिली. कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपुरात आलेल्या अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना चूक झाल्याचं मान्य केलं.

पंढरपूर पालिकेचे थकीत यात्रा अनुदान तातडीने जमा

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.अजित पवारांनी यावेळी आपण अनुदानाचे पैसे जमा झाल्याची ऑर्डर घेऊन आल्याची माहिती देताना आषाढीच्यावेळी दिलेल्या चेकचे पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याचं मान्य केलं. ते म्हणाले की “मागे राज्याचे प्रमुख आले तेव्हा पंढरपूरसाठी पाच कोटींचा चेक दिला होता. पण ते पैसे जमा झाले नव्हते. ही आमची चूक आहे. जेव्हा आपण चेक देतो तेव्हा पैसे जमा झाले पाहिजे. त्यामुळे कालच ऑर्डर काढून, ते पैसे जमा करुन जायचं असं अर्थमंत्री या नात्याने मी ठरवलं होतं. नगराध्यक्षांकडे ती ऑर्डर सुपूर्त केली आहे”.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
“लस लवकर येऊ दे, अवघे जग करोनामुक्त होऊ दे,” अजित पवारांचं विठुरायाला साकडं

पंढरपुरात भरणाऱ्या मुख्य यात्रांसाठी म्हणून पंढरपूर नगरपालिकेस राज्य शासनाकडून ५ कोटींचे अनुदान दिले जाते. यंदाही अशा प्रकारच्या अनुदानाचा प्रतीकात्मक धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी यात्रेवेळी नगराध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. मात्र या धनादेशातील रक्कम पुढे चार महिने झाले तरी पालिकेकडे जमा झालेली नव्हती. याबाबत नगरपालिकेच्या वतीने पाठपुरावा करूनही ही मदत पालिकेच्या तिजोरीपासून दूर राहिली होती. ठाकरे सरकारशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही जाहीर झालेले अनुदान पालिकेला जमा न झाल्याचे पुढे आले होते. या सरकारी अनास्थेबद्दलचे वृत्त बुधवारच्या (२५ नोव्हेंबर) ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होताच शासन दरबारी एकच खळबळ उडाली.

लॉकडाउनसंबंधी मोठं विधान
अजित पवार यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाउनचे नावही नको असं ते म्हणाले आहेत. “गेल्या नऊ महिन्यापासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फारच बिकट झाली आहे. लॉकडाउनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा सर्वांनी निमूटपणे आदेश पाळला,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी काळजी घेण्याचंही आवाहन केलं. यावेळी अजित पवारांनी पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे सांगत आपण उपमुख्यमंत्री पदावर समाधानी असल्याचं सांगितलं.

“अवघ्या जगासमोर करोनाचं आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ करोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत करोनाचे रुग्ण परत वाढत आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच काही बंधने पाळणे गरजेचं आहे. याबाबतीत समस्त वारकरी बांधवांचे आभार मानतो, कारण त्यांनी शासनाच्या आवाहनाला आषाढी यात्रेप्रमाणे कार्तिक यात्रेतही प्रतिसाद दिला. राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिीणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील, असा विश्वास आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.