शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षिरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली.

विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना अजितदादा पवार यांनी बालभारतीच्या नवीन शिक्षण पद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारे आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं.

ठग्ज ऑफ महाराष्ट्र म्हणणारे विखे ‘ठगांमध्ये’ जाऊन कधी बसले कळलेच नाही – अजित पवार

विनोद तावडे यांनी शिक्षणमंत्री असताना ही नवीन पद्धत आणली त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजुला केले आणि शेलारांना शिक्षण मंत्री केले आहे का? असा सवाल करतानाच आता शेलार त्यात दुरुस्ती करतील असं अजित पवार यांनी म्हटलं. जनता व्यक्ती म्हणून कुणाच्या हाती सरकार दिले पाहिजे याचा विचार करते. राज्यपालांच्या अभिभाषणात त्यांनी पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदना वाहिली मात्र महाराष्ट्रातील शहिदांचे, त्यांच्या कुटुबियांचे प्रश्न तसेच आहेत. राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली मात्र आज काही लोक नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करत आहे. हे आपल्या देशाला शोभणारे नाही. हे विचार कुठे तरी थांबवले पाहिजे असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

५००० कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. ६ मंत्र्यांना यावेळी वगळण्यात आले त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही त्यामुळे यांना वगळण्यात आले का ? हे स्पष्ट व्हायला हवे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.