राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात निवडणुकांचे बिगुलही वाजेल. अशातच आता आश्वासनांचा पाऊसही पडण्यास सुरूवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापुरात बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. त्या निमित्त अजित पवार शुक्रवारी सोलापुरात आले होते. यापूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जमनमोहन रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही स्थानिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आघाडी सरकार सत्तेत आल्यास भूमीपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. तसेच यासाठी कायदाही केला जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दलही आपले मत व्यक्त केले. त्यांच्या नेत्यांनी आघाडीबद्दल कोणतेही मत व्यक्त केले तरी ते दुखावतील असे मत आम्ही व्यक्त करणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले. त्यामुळे सोलापुरचा निकाल वेगळा लागला. समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे, असाच आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.