सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर दुसऱ्या दिवशी साताऱ्यात मराठा आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद उमटत आहेत. येथे गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गोवऱ्या पेटवत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.

साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर गुरुवारी अज्ञात व्यक्तीने गोवऱ्या पेटवत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत असल्याची घोषणाबाजी केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घटनेमध्ये काही अज्ञातांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयांवर दगडफेक करत तोडफोड केलीय. या घटनांमुळे साताऱ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द झाल्यानंतर सध्याचा राज्यातील लॉकडाऊन उठल्यावर मराठा समाजाचा उद्रेक होईल असा इशारा साताऱ्यातील मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला बुधवारी आरक्षण रद्द करण्याचा निकाल आला त्या दिवशीच दिला होता. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली होती. या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता असताना आज सकाळी साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर अज्ञाताने गोवऱ्या पेटवून दिल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून काचा फोडल्या. अज्ञातांनी दोन्ही पक्षांच्या कार्यालयाच्या आवारात गोवऱ्या टाकल्या. या घटनेने सातारा शहरात एकच खळबळ उडाली. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अज्ञातांनी हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा प्रकार करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या या घरासमोर आज सकाळी कोणीतरी गोवऱ्या आणून ठेऊन त्या पेटविल्याचे निदर्शनास आले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच व कायम बंदोबस्त असणाऱ्या ठिकाणीच हा प्रकार घडल्याने सातारा शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या पेटलेल्या गोवऱ्या विझविल्या आणि त्या बंगल्यासमोरुन हटवल्या.

या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भवनावरही अज्ञात व्यक्तीकडून सकाळी दगडफेक केली. काचांचा आवाज आल्यामुळे भवनातील कार्यकर्ते बाहेर आले. त्यावेळी गेटवरून उडी मारून संबंधित पळून गेल्याचे निदर्शनास आल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तसेच काँग्रेस भवनावरही दगडफेक झाली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. हे हल्ले करणाऱ्या अज्ञातांचा शोध सुरु करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलीस करत आहेत. दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

या प्रकारानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांची पहाणी केली. अधिक तपासासाठी वरिष्ठ पातळीवरून पोलिसांना सूचना करण्यात आल्यात.