खानापूर-आटपाडीचे  राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल बाबर शिवसेनेच्या तंबूत जाण्याच्या तयारीत असून त्यांनी आज मातोश्रीवर जाऊन सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेउन पक्षप्रवेशाबाबत चर्चा केली असल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राजकीय पक्षात उलथापालथ सुरू झाली असून विटा येथील माजी आमदार बाबर युतीच्या तंबूत जाण्याच्या तयारीत आहेत. खानापूर-आटपाडी हा मतदार संघ महायुतीत शिवसेनेच्या वाटय़ाला असून त्यादृष्टीने विधानसभेची उमेदवारी मिळण्याची खात्री असल्याने बाबर यांनी सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे.
अनिल बाबर यांनी मंगळवारी सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची भेट घेउन प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. सेना प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम ठाकरे यांच्या उपस्थितीत १५ ऑगस्टनंतर विटा येथे होणार असल्याचे बाबर यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.