विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांची मेगाभरती झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, राज्यात सत्तास्थापनेची नवीन समीकरणं उदयास आल्यानंतर भाजपात गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले सहा ते सात आमदारांनी अजित पवारांना फोन करून परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीची सत्ता येणार असेल तर राजीनामा देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पवारांना सांगितले आहे.

अजित पवार यांच्या संपर्कात असलेले आमदार पुणे आणि सातारा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीआधी राष्ट्रवादीला लागलेली ओहोटी भरतीमध्ये बदलणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक आमदार माघारी परतण्यासाठी विचारणा करत असल्याचे वक्तव्य केलं होते.

विधानसभा निवडणुकीआधी सर्वच विरोधी नेते पराभूत मानसिकतेमध्ये होते. पराभवाच्या भितीमुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण आता सत्तेची समीकरणं बदलू लागल्यानंतर पुन्हा परतण्याची तयारी नेत्यांनी केली आहे.

दरम्यान, आज (सोमवार) सत्तास्थापनेबाबत अंतिम निर्णय होणार हे स्पष्ट आहे. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शिवसेनेला आज सायंकाळी साडेसातपर्यंत सत्ता स्थापनेसाठी मुदत दिली आहे. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यानंतर आता काँग्रेसच्या भूमिकीकडे लक्ष लागले आहे. राज्यात सत्तेचं नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता असून काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सरकार स्थापन करण्याचा विचार करत असल्याची सुत्रांची माहिती आहे. विचारधारा पूर्पणणे वेगळी असली तरी काँग्रेस शिवसेनेला समर्थन देत सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. काँग्रेसमधील अनेक नेते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात सकारात्मक आहेत. मात्र राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध आहे. काँग्रेसच्या बैठकीत यासंबंधी चर्चा सुरु असून अध्यक्ष सोनिया गांधी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यापूर्वीच भाजप आमदारांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे