सध्या सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजपा-शिवसेना लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढणार आहेत. मात्र यावेळी एका मुद्यावरुन दोन्ही पक्षांत स्पर्धा रंगली आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री कोण होणार ? एकीकडे शिवसेना आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील असं सूचक विधान करत असताना देवेंद्र फडणवीस मात्र आपणच पुढचे मुख्यमंत्री असू असा छातीठोकपणे दावा करत आहेत. इतकंच नाही देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच असं सांगत मित्रपक्षाच्या नेत्यांना उत्तर दिलं आहे.

शिवेसना आणि भाजपामध्ये रंगलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एक कार्टून ट्विट केलं आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुर्चीवर पाय ठेवून घाबरलेल्या अवस्थेत बसलेले दाखवले आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मदतीने फटाक्यांच्या माळेची वात पेटवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ही फटाक्यांची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले असलेल्या खुर्चीच्या खाली जाऊन संपताना दाखवण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्रीपदाची ‘हॉट सीट’ असंही लिहिण्यात आलं आहे.


मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री!
‘मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असून, पुन्हा या पदावर विराजमान होणारच’, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. गोरेगाव येथे आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते. मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात कलगीतुरा रंगला असताना फडणवीस यांनी मीच पुन्हा मुख्यमंत्रीपदी येणार, असे जाहीर केले. मुख्यमंत्री कोणाचा होणार, याबाबत शिवसेना-भाजपचे नेते वक्तव्ये करतात. अशा नेत्यांचे प्रमाण शिवसेनेत अधिक आहे. पण, हा प्रश्न पक्षाध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मी सोडवू. मी आताही केवळ भाजपचा मुख्यमंत्री नसून शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्षाचाही आहे. युती करूनच निवडणुका लढवणार असलो तरी जनताच मुख्यमंत्री ठरवते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.

भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रभारी सरोज पांडे यांनी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला होता. ज्यानंतर मुख्यमंत्री आमचाच असा दावा करणारी पोस्टर्स नाशिकमध्ये झळकली होती. यावरुन निर्माण झालेला वाद कुठे शमतो न शमतो तोच संजय राऊत यांनी ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असं म्हटलं आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास ते आदित्य ठाकरेच: संजय राऊत
शिवसेनेला मुख्यमंत्री मिळाले तर त्या पदावर आदित्य ठाकरे असावेत अशी पक्षातील नेत्यांसह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असंही त्यांनी म्हटलं होतं.