03 December 2020

News Flash

“उद्धव ठाकरेंनी यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी”

"पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात"

कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. “आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली आहे.

“न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणं आवश्यक होतं. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचं आहे. पण मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आणखी वाचा- “…पण ‘खिसे गरम’ करायचं गणित…”; भाजपाने साधला कारावासाची शिक्षा झालेल्या ठाकूर यांच्यावर निशाणा

पुढे ते म्हणाले आहेत की, “वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील आणि त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते”.

आणखी वाचा- पोलीस मारहाण प्रकरणी मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

काय आहे प्रकरण?
एकेरी मार्गावरून जाण्यास मनाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यासह चालक व दोन कार्यकर्त्यांना अमरावती न्यायालयाने ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मारहाणीची ही घटना २४ मार्च २०१२ रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाभट्टी परिसरात घडली होती. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेत कार्यरत कर्मचारी उल्हास रौराळे यांनी तक्रार दिली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. त्यावेळी वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगून त्यांनी वाहन घेऊन जाण्यास मनाई केली. त्यावर यशोमती ठाकूर यांच्यासह चालक सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनाखाली उतरून उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घातला आणि मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या प्रकरणात न्यायालयाने ५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यातील १ साक्षीदार फितूर झाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना ३ महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:36 pm

Web Title: ncp chandrakant patil yashomati thakur maharashtra cm uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच, संजय राऊत यांचं मोठं विधान
2 “घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच करोना होतो का?”
3 देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागाच्या दौऱ्यावर, बारामतीपासून करणार सुरुवात
Just Now!
X