News Flash

निधी चौधरींवर कारवाईची शरद पवार यांची मागणी

आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली.

महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पवार यांनी लेखी मागणी केली आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांबाबत शासन दरबारी असलेल्या व्यक्तीकडून असा प्रमाद घडावा व त्याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष करावे ही दुर्देवी, अशोभनीय बाब असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.

चौधरींवर कडक कारवाई करावी जेणेकरुन अशा प्रकारची पुनरावृत्ती घडणार नाही. कारवाई न झाल्यास राज्य सरकारची महापुरुषांबाबतची निती खालच्या स्तरावर पोहोचली असा समज होईल, असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण
17 मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली आहे.

निधी चौधरी यांचं स्पष्टीकरण 
काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचं ट्वीट डिलीट केलं आहे. तुम्ही 2011 पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही. माझे ट्वीट व्यंगात्मक होते. आंदोलन करणाऱ्यांनी ते पूर्ण वाचलेले नाही. त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. गांधीजींवर माझी अपार श्रद्धा आहे. माझ्याकडून त्यांचा अवमान होणे शक्यच नाही. गांधीजींवर यापूर्वी मी अनेकदा ट्वीट केले आहे, ती पाहू शकता. गांधीजी या देशात जन्माला आले, याबाबत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत, असे ट्वीट मी यापूर्वी केलेले आहेत. त्यामुळे गांधीजींची हत्या करणाऱ्याचे समर्थन मी कधीच करणार नाही. काही लोक या ट्वीटचा राजकीय लाभ उठवू पाहात आहेत, हे दुर्दैवी आहे. गांधीजींचा अवमान करण्याचा मी स्वप्नातही विचार करु शकत नाही. असं स्पष्टीकरण निधी यांनी आपल्या विविध ट्विटमध्ये दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 8:08 am

Web Title: ncp chief sharad pawar demand action on ias officer nidhi choudhary
Next Stories
1 १० कोटी रोजगार निर्माण झाले नाही त्याची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही – उद्धव ठाकरे
2 ‘भाजप-शिवसेनेला विधानसभेसाठी समान जागा’
3 साहसी खेळाबाबतचे नियम दुर्लक्षितच!
Just Now!
X