03 March 2021

News Flash

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषकाची कमतरता! पवारांचा टोला

राजनाथ सिंग यांच्या टीकेला शरद पवारांचं सणसणीत उत्तर

आमच्या सर्कशीत प्राणी आहेत फक्त विदुषकाची कमतरता आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना सणसणीत टोला लगावला आहे. राजनाथ सिंग यांनी काल झालेल्या महाराष्ट्र जनसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे अशी टीका राजनाथ सिंग यांनी केली होती. या टीकेला आता शरद पवार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.आजपासून दोन दिवस शरद पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी जेव्हा शरद पवार यांना राजनाथ सिंग यांच्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते राजनाथ सिंग?
“महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. करोनाच्या संकटात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते चांगलं नाही. शरद पवारांसारख्या जाणकाराच्या हाती या सरकारची सूत्रं आहेत तरीही असं घडतं आहे हे याचं आश्चर्य वाटतं. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्त्वात आहे का? असाही प्रश्न पडतो.”

भाजपाच्या व्हर्चुअल रॅलीत राजनाथ सिंग यांनी शरद पवार आणि ठाकरे सरकारवर या शब्दांमध्ये टीका केली. त्यावर शरद पवार यांना विचारलं असता, आमच्या सर्कशीत प्राणी आहेत फक्त विदुषकाची कमतरता आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. एवढंच नाही तर त्यांनी भाजपाच्या नेत्यांची समाचार घेतला. “भाजपाच्या लोकांनी कोकणाचे दौरे वगैरे केले, त्यांनी नारळाची अनेक झाडंही उभी केली याचा मला आनंद आहे” असंही उपाहासाने शरद पवार म्हणाले.

राजनाथ सिंग यांच्या वक्तव्याचा शिवसेनेनेही समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम अत्यंत सुसूत्रतेने सुरु आहे. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्येच सर्कस सुरु आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 9:39 pm

Web Title: ncp chief sharad pawar gave answer to rajnath singhs circus comment on maharashtra government scj 81
Next Stories
1 ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईचे निकष बदला : प्रविण दरेकर
2 माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे निधन
3 तीन महिन्यातील वादळामुळे महावितरणला ३.४१ कोटींचा फटका
Just Now!
X