राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ पडला असून अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं सांगत मदत जाहीर करण्याची विनंती नरेंद्र मोदींकडे केली. शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये जवळपास पाऊण तास बैठक सुरु होती. शरद पवारांनी नरेंद्र मोदींना राज्यात सत्तास्थापनेचा संघर्ष निर्माण झाला असल्या कारणाने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुम्ही त्वरित हस्तक्षेप करावा अशी विनंती केली. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील पिकांचं खूप मोठं नुकसान झालं असून हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निदर्शनास आणून दिलं असल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “मी दोन जिल्ह्यांचा दौरा करत नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत माहिती घेतली आहे. पण अवकाळी पावसाची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचाही समावेश आहे. मी यासंबंधी सविस्तर माहिती घेत असून तुमच्याकडे लवकरात लवकर पाठवून देईन”.

“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने तुम्ही तात्काळ मध्यस्थी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही तात्काळ पावलं उचललीत तर मी तुमचा आभारी असेन,” असंही शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना राज्यपालांनी जाहीर केलेली आठ हजार कोटींची मदत अपुरी असून अद्याप ती मिळाली नसल्याचं सांगितलं. हेक्टरी किमान ३० हजारांची मदत दिली जावी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. तसंच २०१२-१३ ला आम्ही हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत दिली होती अशी माहिती त्यांनी नरेंद्र मोदींना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी नरेंद्र मोदींना वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूटसंबंधी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं असून ३१ जानेवारीला नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.

या बैठकीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात महाराष्ट्रातील सत्तापेचावरही चर्चा होईल असं सांगितलं जात होतं. शरद पवार यांनी मात्र बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे. शरद पवारांसोबत बैठक सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना बोलावून घेतलं होतं. तसंच शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.