तीन दशकानंतर शरद पवार यांची बेळगावमध्ये सभा

बेळगावच्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचे लक्ष वेधलेले  असते . सीमाप्रश्न सुटण्यासाठी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व जागा निवडून आणल्या पाहिजेत . हे यश मिळवले तर सीमावासीयांना  सन्मानाने जगण्याची वेळ आणल्याशिवाय  स्वस्थ बसणार नाही, असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बेळगाव येथे व्यक्त केले.

बेळगाव येथे सीमावासीयांसाठी तब्बल तीन दशकानंतर शरद पवार यांची शनिवारी रात्री  जाहीर सभा झाली, या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत  होते. त्यांच्या हस्ते सीमा लढय़ात विशेष योगदान दिलेले ज्येष्ठ नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे,कॉम्रेड वकील राम आपटे,वकील किसनराव येळ्ळूरकर यांचा सत्कार करण्यात आला. विशेष अटी घालून मेळाव्यास परवानगी देण्यात आली होती.

सीमाप्रश्नाच्या लढाईत संघर्षांच्या चार पिढयम स्वत:च्या संसाराचा विचार न करता भाषा व अस्मितेची लढाई लढत आहेत. त्यांच्यासमोर  नतमस्तक होण्याचा हा प्रसंग आहे, असा उल्लेख  पवार यांनी प्रारंभी केला.

सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील खटल्याकडे लक्ष वेधून पवार म्हणाले,की सीमाप्रश्नाचा रस्त्यावरील लढा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. न्याय मिळावा ही काळजी घेऊ न देशाच्या निष्णात वकिलांची नियुक्ती या न्यायालयीन लढयासाठी केली गेली आहे . न्यायदेवता निश्चित न्याय देईल. आम्हाला शंका नाही. मात्र, सीमाबांधवांनी एकत्रितपणे लढणे आवश्यक आहे.

आगामी काळातील लढा प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने लढा, असे आवाहन त्यांनी केले. १९६२ साली एकीकरण समितीचे सात, १९६७ साली पाच तर आज केवळ दोन आमदार निवडून आले आहेत . न्यायालयातील  याचिकेला  बळकटी मिळण्यासाठी समितीचे अधिकाधिक  आमदार निवडून येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .

तुम्ही देश पातळीवरचे नेते असूनही बेळगावला का जात आहात ,  असा प्रश्न मला अनेकांनी विचारला तेंव्हा, मी कोणत्याही भाषेशी वैर करत नाही.  देशातील बंगाली,  पंजाबी,  गुजराती भाषेचा  जसा आदर करतो तशी बाकीच्या नेत्यांनी मराठी बाबत भूमिका स्वीकारावी , अशी माझी  भावना आहे . हेच  माझे  सूत्र  सर्वानी स्वीकारावे , असे म्हणत त्यांनी सीमाभागात  मराठीचा द्वेष करणाऱ्यांना फटकारले .

माजी मंत्री जयंत पाटील , खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने यांची भाषणे झाली .  मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी प्रास्ताविक केले, तर कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्वागत केले . मध्यवर्ती सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी आभार  मानले.

सीमाप्रश्नाचे मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील, शहर एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर,आमदार अरविंद पाटील,  उपमहापौर मधुश्री पुजारी, रामभाऊ  राठोड, प्रकाश मरगाळे,  राजाभाऊ  पाटील, जयराम मिरजकर उपस्थित  होते.