सध्या पंतप्रधानपदासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांनी गडकरींचे कौतुक केले आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शनिवारी गडकरींच्या पंतप्रधानपदासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी नितीन गडकरी विधिमंडळापासूनचे आपले सहकारी आहेत. पंतप्रधानपदासाठी आता त्यांचे नाव येत असल्याने मला त्यांची चिंता वाटते असे शरद पवार म्हणाले. एबीपी माझाने हे वृत्त दिले आहे.

अलीकडे पंतप्रधानपदासाठी मोदींच्या बरोबरीने गडकरींच्या नावाची चर्चा आहे. गडकरींनी जाहीर कार्यक्रमात काही विधाने केली. ती विधाने मोदी यांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढण्यात आला. स्वत: गडकरींनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे सांगून या चर्चांना पूर्णविरोम देण्याचा प्रयत्न केला. पण गडकरींच्या नावाची चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. गडकरींना मोदींच्या स्पर्धेत आणून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण करण्याची विरोधकांची रणनिती आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा गडकरींचे कौतुक केले होते.

दरम्यान अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही असेही भविष्य या परिषदेत वर्तवण्यात आले.

भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने सहकार्याने सत्ता स्थापन करावी लागेल, असे झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान म्हणून मिळेल अशी भविष्यवाणी या भविष्य परिषदेत वर्तवण्यात आली. गडकरी यांच्या ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे २०१९ मध्ये त्यांना सर्वात मोठी संधी आहे असंही यामध्ये म्हटलं आहे.