X
X

‘माणसाने आशा ठेवायला पाहिजे’ म्हणत पवारांचा फडणवीसांना टोला

महाविकास आघाडी सरकारला मिळणारा पाठिंबा पाहून विरोधक अस्वस्थ

सत्ता गेल्याचा त्रास होत असतो. मी समजू शकतो, त्या त्रासाच्या उद्वेगाच्या पोटी काही लोक चुकीचे शब्द वापरतात. त्यांची सत्ता गेली ही त्यांची अस्वस्थता आहे. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. माणसाने काही आशा अपेक्षा ठेवली पाहिजे त्याबद्दल काहीही वाद नाही. कारण त्यांनी मागेही सांगितले होते की मी पुन्हा येईन. त्यामुळे ते तसंच बोलले पण ठीक आहे लोक याकडे बारकाईने लक्ष देतात असं म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. मुंबईत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात भाजपाचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्यावर कडाडून टीका केली.

महाविकास आघाडीचं सरकार हे बेईमानी करुन आलेलं सरकार आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याबाबत शरद पवार यांना विचारलं असता, “सत्ता गेल्यानंतर असा त्रास होतो, मी समजू शकतो. त्या त्रासाच्या पोटी, उद्वेगापोटी लोक असे शब्द वापरत असतील. त्यांचं म्हणणं इतकं गांभीर्याने घेण्याची गरज नाही” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारला मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहून समोरच्या विरोधी पक्षाचे नैराश्य वाढले आहे. त्या नैराश्याचे प्रतीक म्हणजे त्यांची सध्याची वक्तव्ये आहेत. आता आपल्याला सत्ता मिळणार नाही याबाबतची अस्वस्थता आहे तसंच संतापही आहे त्यातून हे सगळं व्यक्त केलं जातं आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले की रावसाहेब दानवेंना गेल्या अनेक वर्षांपासून काम करताना आम्ही पाहिलं आहे. त्यांचा ज्योतिषाचाही अभ्यास झाला आहे हा गुण मला ठाऊक नव्हता. ज्योतिष शास्त्राचे ते जाणकार दिसतात, मलाही आत्ताच त्यांचा हा परिचय झाला आहे. पण सामान्य माणसं सोबत असतील तर कुडमुड्या ज्योतिषांचे काही काही चालत नाही असाही टोला शरद पवार यांनी लगावला.

21
READ IN APP
X