गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडे बोल सुनावले. प्रचारासाठी पाकिस्तानचा वापर करणे चुकीचे असून देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये बाहेरील ताकदीला स्थान न देण्याची देशाची परंपरा मोडण्याचा प्रयत्न स्वतः पंतप्रधानांकडून होत आहे, याचे दुःख वाटते, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी नागपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. विधानभवनावर धडकल्यानंतर शेवटी शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना फसवले. आता कर्जमाफी न झाल्यास सरकारी देयके थकवा, या सरकारबाबत असहकाराची भूमिका घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले,  माझ्याकडे आल्यावर मी त्यांना जागा दाखवतो, असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना राज्य चालवण्याचा अधिकार आहे हे मान्य. पण दमदाटीने जेलमध्ये टाकण्याची भाषा कराल, तर तुम्हाला उखडून टाकण्याची ताकद या देशाच्या बळीराजात आहे हे लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले.  डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या व्यक्तीवर पाकिस्तानच्या मदतीने गुजरातचा मुख्यमंत्री ठरवण्याचे आरोप पंतप्रधानांनी केले, हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेत नाही, आता त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची घाई झाली, असा आरोप विरोधक करतात. मात्र आम्हाला सत्तेत येण्याची घाई नाही, असे त्यांनी सांगितले. मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान होण्यासाठी नव्हे तर जनतेच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी सत्तेवर आले पाहिजे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. भाजप फक्त आश्वासन देणारा पक्ष असून आश्वासन दिल्यावर त्यांना विसर पडतो. शेतकरी आत्महत्या करतोय, दुसरीकडे नोटाबंदी आणि जीएसटी लादला जातो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खोटी आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला आहे, मात्र अशा लोकांना माफ केले नाही पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारची झोप उडाली असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली एकी कायम ठेवावी, २०१९मध्ये सत्तांतर नक्कीच होईल, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.