शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा अकोल्यात आंदोलन करत असतानाच या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागती ही लज्जास्पद बाब आहे, अशी टीका पवारांनी केली. दुसरीकडे शिवसेना आणि भारिपनेही या आंदोलनाला पाठिंबा देत रास्ता रोको केला. त्यामुळे अकोल्यातील आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनात भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

अकोल्यातील शेतकरी जागर मंचद्वारा कापूस, सोयाबीन आणि धान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत संबोधित करताना यशवंत सिन्हा यांनी शेतकरी ‘सर्जिकल स्ट्राईक’ करतील असा इशारा देत अकोल्यापासून आंदोलनाला सुरुवात करु अशी घोषणा केली होती. यानुसार सोमवारी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन करु, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेवटी संध्याकाळी सव्वा पाचच्या पोलिसांनी यशवंत सिन्हा व नेत्यांना ताब्यात घेतले. रात्री त्यांची सुटका देखील झाली होती. यशवंत सिन्हा अटक करण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मंगळवारी पोलीस मुख्यालयातच मुक्काम ठोकलेल्या यशवंत सिन्हा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी चर्चा करुनच पुढील दिशा स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितले. सिन्हा यांनी शरद पवार यांच्याशी देखील फोनवरुन चर्चा केली. शरद पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी होणार असे सूत्रांकडून समजते. भाजपच्या नेत्यानेच सुरु केलेल्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजपची कोंडी केली आहे. सर्व पक्षीय नेते या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटण्याची शक्यता आहे.