शरद पवार यांनी लोकसभेला उभं रहावं असा आग्रह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी बैठकीत केला असून तेच माढामधून लढण्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करतील अशी माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, ‘बैठकीत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील किंवा शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सीपीएम अशा संघटनांशी काय चर्चा झाली याचा आढावा शरद पवार यांनी घेतला. दिल्लीतील बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती शरद पवार यांनी दिली. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी भेट घेतली त्याबाबतची माहितीही दिली’.

भाजपा सरकार पुन्हा येऊ नये म्हणून सर्वजण एकत्र येत आहोत. काही जागा सोडाव्या लागतील यासाठी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला जाणार नाही. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विशेष अधिकार आहेत. साहेब आणि जयंत पाटील पुढील निर्णय घेतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

आमची भूमिका स्पष्ट आहे. एकीकडे एक सांगायाचं आणि दुसरीकडे दुसरं असे आम्ही करणार नाही. ९ मार्चला आचारसंहिता लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष एकत्र सभा घेतील. २० फेब्रुवारीला नांदेड आणि २३ फेब्रुवारीला परळी वैजनाथ येथे एकत्रीत जाहीर सभा होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.