राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंबंधी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या आयएएस अधिकारी निधी चौधरींना बडतर्फ करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्या नेतृत्त्वात मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपित्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी घोषणा देण्यात आली.

मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासमवेत महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, नगरसेविका डॉ. सईदा खान, राज्य उपाध्यक्ष सोनल पेडणेकर, कल्पना शिर्के, महेंद्र पानसरे, सुनिल पालवे, राजेंद्र थोरात आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा गांधींवरील ट्विट भोवलं, IAS निधी चौधरींची बदली

निधी चौधरी यांनी महात्मा गांधींचा अपमान केला आहे. त्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही. निधी चौधरी यांच्या ट्विटमधून त्यांची मानसिकता लक्षात येत असून त्यांना राजाश्रय न देता कारवाई करावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. भाजपाचे सरकार आल्यानंतरच महात्मा गांधीजींचा अपमान आणि गोडेसेंचे गुणगान गाण्याचे प्रकार का वाढत आहे ? असा संतप्त सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला.

दरम्यान वादग्रस्त ट्विटची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावरून त्यांची मंत्रालयात उचलबांगडी करण्यात आली आहे. निधी चौधरी यांची मुंबई महापालिकेतून मंत्रालयात पाणी पुरवठा विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच त्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.

कोण आहेत निधी चौधरी –
निधी चौधरी या आयएएस 2012 बॅचच्या अधिकारी असून मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त (विशेष) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्या सहाय्यक कलेक्टर होत्या.

काय आहे प्रकरण
17 मे रोजी निधी चौधरी यांनी ‘महात्मा गांधी यांची 150 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. पण, आता वेळ आली आहे…जे रस्ते, संस्थांना गांधींचे नाव दिले आहे, ते काढून टाकावे…जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत…तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा…हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल…30-1-1948 साठी थँक्यू गोडसे.’ असे वादग्रस्त ट्विट करुन महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर त्यांचं हे ट्विट काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यावर लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत असल्याचं पाहून निधी चौधरी यांनी ते ट्विट डिलीट केले आणि नवीन ट्विट्सद्वारे आपली बाजू मांडली.