राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर…,” संजय राऊतांचं मोठं विधान

“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

दुसरीकडे शिवेसनेने याबद्दल बोलताना राजकारणात काहीही होऊ शकतं असं सांगत शरद पवारांमध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं सांगितलं होतं. “राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संपूर्ण क्षमता सध्या जर कुणामध्ये असेल तर ती शरद पवार यांच्यामध्ये आहे. प्रश्नांची तसंच देशाची जाण, लोकांची नाडी ओळखणं, खंबीरपणा या सर्व गोष्टी शरद पवार यांच्याकडे आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे.” असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

आणखी वाचा- “पवारांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा राहुल गांधींविरोधातील मोहिम; काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट”

“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.” असं देखील यावेळी राऊत म्हणाले.