मंगळवारी, बुधवारी चार सभा

येत्या मंगळवारी आणि बुधवारी राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा जालन्यात येत आहे. जिल्ह्य़ातील भाजपच्या तीनही मतदारसंघात या निमित्ताने होणाऱ्या चार जाहीर सभांमध्ये राष्ट्रवादीचे राज्य पातळीवरील नेते ‘फसव्या’ सरकारचा सार्वत्रिक निषेध करणार आहेत.

जिल्ह्य़ातील पाचपैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवेही याच जिल्ह्य़ातील आहेत. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेनिमित्त मंगळवारी सायंकाळी सहा वाजता भाजपचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातील मंठा येथे जाहीर सभा होणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता भाजपचे आमदार संतोष दानवे यांच्या मतदारसंघातील जाफराबाद येथे जाहीर सभा होईल. याच दिवशी दुपारी तीन वाजता भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या मतदारसंघातील अंबड येथे आणि सायंकाळी सात वाजता आमदार कुचे यांच्याच मतदारसंघातील बदनापूर येथे जाहीर सभा होईल.

जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले, की पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाचा दुसरा टप्पा मराठवाडय़ात सोळा जानेवारी रोजी तुळजापूर येथून सुरू झाला असून त्याची सांगता तीन फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावरील मोर्चाने औरंगाबाद येथे होईल. औरंगाबाद येथील समारोपाच्या मोर्चास शरद पवार उपस्थित राहतील. राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी आहे. कापसावरील बोंडअळीच्या नुकसानीबद्दल शासनाने तीन स्तरावरून नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात यासंदर्भातील अंमलबजावणीच्या संदर्भात साशंकता आहे. जिल्ह्य़ात शासकीय आधारभूत खरेदीने धान्य खरेदीचे एकही केंद्र सुरू नाही. तुरीच्या शासकीय खरेदी केंद्रास अद्याप परवानगी नसून फक्त ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. शासन प्राथमिक शाळा बंद करीत आहे. जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर शासकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, असेही आमदार टोपे म्हणाले.