पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, बविआ आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : युती सरकाच्या काळात पालघर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात भोपळाही फोडता न आलेल्या भाजपपुढे सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. जिल्ह्य़ात महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी झालेला नसला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षांच्या एकत्रीकरणाचा फटका काही ठिकाणी भाजप, शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होईल, अशी शक्यता होती. परंतु, निवडणूक आयोगाने नववर्षांच्या सुरुवातीलाच निवडणूक जाहीर केल्याने राजकीय पक्षांची धावपळ उडाली. शिवाय आरक्षित जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरबदल झाल्याने उमेदवारांची नावे व पक्ष मतदारांना अवगत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्या पक्षांकडे कार्यकर्त्यांची फळी व त्यांचा मतदारांशी जनसंपर्क आहे त्यांना या निवडणुकीत लाभ होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी तीन गटांत, तर ११४ गणांपैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली असून, ५४ जागांसाठी २१३ उमेदवार रिंगणात आहेत. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसने महाआघाडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नाला पूर्णत: यश आले नाही. सुमारे ३५ ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढती होत असून स्थानिक पातळीवर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर राजकीय गणिते अवलंबून आहेत. गेल्या वेळी भाजपला २१ जागा मिळाल्या. मात्र यंदा तलासरी, विक्रमगड, वाडा व बोईसर भागांत त्यांना विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. शिवसेनेला गेल्या निवडणुकीत १६ जागा मिळाल्या. यंदा ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अंतर्गत गटबाजी व नाराजीचा फटका काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.

बविआच्या अपेक्षा..

भाजप नेते विष्णू सावरा हे पावणेपाच वर्षे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री होते. पण ते राजकीयदृष्टय़ा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पुत्राचा पराभव झाला. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी पूर्वीइतकी आपली ताकद शाबूत ठेवेल अशी अपेक्षा असून राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ातील सहापैकी तीन विधानसभेच्या जागा जिंकलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्याचा ठाकूर यांचा प्रयत्न आहे.