खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विश्वास

केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जनमानसात प्रचंड नाराजी असून काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित येऊन निवडणुका लढविल्यास निश्चितच सत्तापरिवर्तन होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सोलापूरजवळील तिऱ्हे येथे काँग्रेसचे कार्यकर्ते भारत जाधव यांच्या फार्म हाऊसवर हुरडा पार्टीसाठी आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी अनौपचारिकपणे संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने उपस्थित होते. गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या केंद्र व राज्यातील भाजपच्या सत्ता कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. नोटाबंदी, असह्य़ जीएसटी, वाढती महागाई या मुद्दय़ावर जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याच्या  तयारीत आहे. सरकारवर कामगार, नोकरदार, शेतकरी, व्यापारी व उद्योजक यापैकी कोणताही घटक समाधानी नाही, असे मत खासदार मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले. केवळ खोटय़ा घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करायची, हाच एककलमी कार्यक्रम  भाजपने राबविल्याचा आरोपही त्यांनी केला.

आर्थिक उलाढालीच्या संदर्भात राज्यात चौथ्या क्रमांकावर  असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आगामी निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी मतभेद व मनभेद संपुष्टात आणल्यास विरोधकांना कोणत्याही प्रकारचा राजकीय लाभ घेता येणार नाही, असा अभिप्रायही त्यांनी व्यक्त केला. याकामी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे पुढाकार घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.