|| मोहनीराज लहाडे

एकत्र येण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस

नगर : शहराचे महापौर, भाजपचे बाबासाहेब वाकळे यांच्या पदाची मुदत जूनअखेरीस संपुष्टात येत आहे. येत्या दोन-चार दिवसांत महापौर पदाच्या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. सर्वाधिक संख्याबळ असूनही सत्तेपासून वंचित ठेवले गेल्याने शिवसेनेने महापौर पदासाठी यंदा जोर लावला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसचेही महापौरपदासाठी प्रयत्न आहेत. भाजपकडे या आरक्षित पदासाठी उमेदवार नाही. पक्षीय बलाबलाचा विचार केला तर कोणत्याही पक्षाला युती-आघाडी केल्याशिवाय महापौर पद मिळणार नाही.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी नगर शहरात मात्र शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यामध्ये विळा-भोपळ्याचे संबंध आहेत. त्याला मोठा राजकीय वादाचा इतिहास आहे. याच वादातून राष्ट्रवादीच्या सहकार्यातून भाजपचा महापौर झाला. आताही महापौर कोण होणार यापेक्षाही सत्तेची समीकरणे कशी जुळणार, शिवसेना-राष्ट्रवादी खरच एकत्र येणार की राष्ट्रवादी-भाजप एकत्रच राहणार, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. ही समीकरणे शहरातील राजकारणावर दूरगामी ठरणारी आहेत. भाजपने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे जाहीर के ले आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येणार का, की दोन्ही पक्षाच्या वादातून अत्यंत अल्पमतातील काँग्रेसची लॉटरी लागणार, हाच जिल्ह्यातील चर्चेचा विषय झाला आहे. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी आघाडीचा विषय अडचणीचाही झाला आहे. राष्ट्रवादीचे शहरातील सर्वेसर्वा आमदार जगताप पिता-पुत्रांना विरोध हाच शिवसेनेचा शहरातील राजकारणाचा पाया आहे तर राज्यभर गाजलेल्या केडगाव उपनगरातील दोन शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात शिवसेनेने गोवल्याचा राग आमदार संग्राम जगताप यांना आहे. या दोन्हीकडे दुर्लक्ष करून शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येणार का आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाही राष्ट्रवादी महापौर पदासाठी भाजपशी संग करणार का, याच मुद्द्यावर शहराचे आगामी राजकारण ठरणार आहे.

हा गुंता शिवसेना व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते कसा सोडवतात हाच औत्सुक्याचा मुद्दा ठरणार आहे. कारण ‘केडगाव दुहेरी हत्याकांड’ प्रकरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरला धाव घेत राष्ट्रवादी व भाजपवर गुंडगिरी-दहशतीचे आरोप केले होते. याच कारणातून सर्वाधिक संख्याबळ असूनही राष्ट्रवादीने शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी, महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा दिल्याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी लक्ष घालून शहर जिल्हाध्यक्षासह तब्बल १९ नगरसेवकांची हकालपट्टी केली होती. आ. संग्राम जगताप यांच्यावर पवार यांनी कारवाई टाळली होती. मात्र त्याचा परिणाम नंतर जगताप यांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यावर झाला.

राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावरून शिवसेना नगरसेवकांत दुफळी पडलेली आहे. शहर व पक्ष संघटनेवर एक हाती वर्चस्व ठेवणारे अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेला एकमुखी नेतृत्व राहिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची आघाडी करण्यावरून मौन ठेवत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हा विषय वरिष्ठांवर सोपवला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी पुन्हा भाजपशी घरोबा करण्याचे धाडस दाखवणार का, अशा प्रश्नांची गुंतागुंत आहे. त्यातच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर आमदार जगताप यांनी राष्ट्रवादीचे  सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट  घेतली. आगामी महापौरपद अनुसूचित जातीसाठी (महिला) राखीव आहे.

राज्यातील महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे नगरच्या महापौर पदासाठी उमेदवार आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची एकत्रित बैठक घेऊन महापौर निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल. अद्याप नगरसेवकांची बैठक झाली नाही. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बैठक घेऊन चर्चा केली जाईल. राष्ट्रवादीचा महापौर करायचा की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय झालेला नाही. -आमदार संग्राम जगताप, नगर

महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा महापौर करू, असे सुतोवाच केले आहे. त्यामुळे सेनेचा महापौर होण्यास कोणताही अडसर राहिलेला नाही. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो सर्व नगरसेवकांना मान्य असेल. -दिलीप सातपुते, शहर प्रमुख, शिवसेना.

महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. -महेंद्र गंधे, शहरजिल्हाध्यक्ष, भाजप