पराभवातून काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा

जिल्हा परिषद तसेच जिल्ह्य़ातील नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारंपरिक वर्चस्वक्षेत्रात भाजपने मुसंडी मारल्याने दोन्ही काँग्रेसच्या कळपात धोक्याचा संदेश गेला आहे. त्यातूनच सांगली महानगरपालिका निवडणुकीला अजून वर्षभराचा अवधी असला तरी दोन्ही काँग्रेसने आतापासूनच एकत्र येण्याची तयारी दर्शविली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी झालेल्या भाजपची कोंडी करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली असून याची झलक म्हणून प्रभाग समिती सभापती निवडीत राष्ट्रवादीला संधी देऊन श्रीगणेशा केला आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये एकमेकाला पाण्यात पाहणारे हे पक्ष केवळ भाजपच्या हाती सत्ता जाणार या भयानेच सध्या ग्रासले असून निकड म्हणून दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

मतदारांनी राष्ट्रवादीला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा कौल दिला होता. मात्र हे आता जाणीवपूर्वक विसरून राष्ट्रवादीही सत्तेच्या मंदिरात विराजमान झाली आहे. मात्र विरोधाभास असा की, स्थायी समिती आणि प्रभाग समितीमध्ये सत्तास्थाने असताना यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आजही आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची कितपत पूर्तता या मंडळींनी केली याचा जर लेखाजोखा मांडला तर आजही त्याच समस्या कायम असल्याचे चित्र पावलोपावली जाणवते. सरत्या वर्षांत मुख्य रस्त्याची कामे घाई-गडबडीने केली जात आहेत. गेली चार वष्रे लोक नागरी सुविधासाठी टाहो फोडत असतानाही त्याची दखल घ्यावी असे ना सत्ताधाऱ्यांना वाटले ना विरोधकांना वाटले. आपआपल्या सोयीची कामे मंजूर करणे, ज्यात मलिदा मिळण्याची संधी आहे अशा कामांना मान्यता मिळविणे हेच महत्त्वाचे काम पार पाडले गेले.

आश्वासनांचे काय?

माळबंगल्याचे पाणीपुरवठय़ाचे काम मार्गी लागले, मात्र या कामात जागा खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकली, आरोग्य सेवा काय दिवे लावते कुणाला दखल, यातील औषध खरेदी एक कुरण असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील डासमुक्ती कागदावरच, भटक्या कुत्र्याची समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नाचा अभाव प्रकर्षांने जाणवतो आहे. ड्रेनेज योजनेतील संशयास्पद व्यवहार आजही चालू आहे, मात्र ठेकेदाराला योजनांबाबत कामाची देयके अदा करण्यास महासभेत विरोध करणारी मंडळी पडद्याआड मात्र समर्थन करीत आहेत. गेली पाच वष्रे हे काम रखडले आहे, मात्र याप्रकरणी ठेकेदारांचे कान धरण्याची कोणाचीच िहमत नाही.  नकारात्मक बाबी समोर असताना काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम यांनी ७० टक्के आश्वासनाची पूर्तता केल्याचा दावा केला आहे. खोकीधारकांचे प्रश्न, रस्त्यावर असलेल्या भाजीबाजाराचा प्रश्न सोडविण्यासाठी इच्छाशक्तीचा अभाव तीव्रपणे जाणवतो. तरीसुद्धा दोन्ही काँग्रेस एकसंधपणे मतदारांना सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत असलेल्या मतभेदामुळे महापौर बदल करण्याचे धाडस नेतेमंडळींनी दाखविलेले नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

भाजपचा नाराजांवर गळ

भाजपने मात्र शहर जिल्हाध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ यांच्याकडे महापालिकेची रणनीती दिली असली तरी पडद्याआड माजी शहराध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील हे शहरात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. कोणत्याही स्थितीत महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवायचा या दिशेने प्रयत्न सुरू असून यासाठी काँग्रेसमधील नाराजांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तशी बोलणीही झाली आहेत. मात्र याला अंतिम स्वरूप वार्डरचनेनंतर येणार आहे. सध्या अन्य कोणत्याही निवडणुका नसल्याने वाजंत्रीची गदारोळ उडवीत काँग्रेस व राष्ट्रवादीत बेबनाव कसा निर्माण होईल याकडेच भाजपचे लक्ष आहे.

काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी रस्सीखेच

काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या पश्चात ही निवडणूक होत आहे. यामुळे सत्ताधारी काँग्रेसचे नेतृत्व श्रीमती जयश्री पाटील यांच्याकडे आले असले तरी वंशपरंपरागत नेतृत्व अमान्य करीत शेखर माने हे आपले नवे नेतृत्व सांगलीसाठी तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. काँग्रेसअंतर्गत कमी होत असलेली ताकद राष्ट्रवादीशी सहकार्य करून भरून काढण्याचा प्रयत्न डॉ. कदम यांचा आहे. नव्याने निर्माण झालेल्या नातेसंबंधातून ही सोयरीक होत असली तरी वसंतदादांचे थेट वारस असलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व विशाल पाटील यांना मान्य होईलच असे नाही. त्यांची राजकीय गणिते विधानसभा आणि लोकसभा निवडणुक नजरेसमोर ठेवून असणार आहेत.

याचबरोबर स्वाभिमानी विकास आघाडी ही भाजप, जनता दल, शिवसेना यांचे कडबोळे आहे. या गटाची भूमिकाही नव्या राजकीय रचनेत महत्त्वाची ठरणार आहे. शेखर माने, उपमहापौर विजय घाडगे यांच्या गटाची आतापासूनच जुळणी सुरू झाली असून भाजपला विरोध करीत असताना काँग्रेसअंतर्गत मतांची बेरीज करायची धोरणे दिसत आहेत. या गटाच्या दृष्टीने महापालिका निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालिम असणार आहे.