सोलापुरात एका राष्ट्रीय फुटबॉलपटूचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह एका रुग्णालयात नेऊन टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलासह सहा जणांजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे निश्चित कारण लगेच समजू शकले नसले तरी प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रदीप विजय आलाट (वय ३५, रा. कुमार चौक, फॉरेस्ट, सोलापूर) असे खून झालेल्या राष्ट्रीय फुटबॉलपटूचे नाव आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याच्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  प्रदीप आलाट हा राष्ट्रीय फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकही होता. तो काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देत असे. तो सकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी स्वयंसेवक म्हणून जाण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. नंतर सायंकाळी प्रदीपला विजापूर रस्त्यावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर काही जणांनी मारहाण केली. त्या वेळी जखमी अवस्थेत प्रदीप याने आपल्या काही मित्रांना मोबाइलद्वारे संपर्क साधून, आपणांस आयटीआयजवळ मारहाण होत असून तुम्ही लगेचच या, असे कळविले. त्यानुसार त्याचे मित्र किरण पांढरे, विनायक हत्ती व सूरज ढसाळ असे तिघे जण लगेचच आयटीआयसमोर आले. परंतु तेथे प्रदीप दिसला नाही. तेव्हा त्याला मोबाइलद्वारे पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. मात्र तेथे जवळच त्याची दुचाकी दिसली. म्हणून किरण पांढरे याने तेथे रस्त्यावर भाजी विकणाऱ्या व्यक्तींकडे विचारणा केली असता त्यांनी, एका मुलीला आणि दुचाकी चालविणाऱ्या तरुणाला पाच-सहा जणांनी मारहाण करीत विजापूर रस्त्याच्या दिशेने नेल्याची माहिती सांगितली. दरम्यान, प्रदीप यास गंभीर जखमी अवस्थेत हल्लेखोरांनी रामवाडीजवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले आणि त्याला एकटय़ालाच टाकून तेथून लगेचच पळ काढला. दरम्यान, त्या रुग्णालयातून या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. प्रदीप याचा वैद्यकीय उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे दिसून आल्यानंतर त्याचा मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सवरेपचार शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. तेव्हा मृत प्रदीपच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे