शहरातील जुने धुळे भागात होळीच्या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षकासह हवालदारावर तलवारीने वार केल्यानंतर फरार झालेल्या राष्ट्रवादी नगरसेवकाच्या दोन्ही मुलांसह पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. एकूण २५ ते ३० जणांविरुद्ध दंगल, प्राणघातक हल्ला आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ मार्च रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली काही जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला संतप्त जमावासमोर अक्षरश: नमते घ्यावे लागले. चौकातील सचिन बडगुजर या संशयितास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवेंद्र ऊर्फ देवा सोनार याने साहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या डोक्यावर तलवारीने वार केले. या वेळी देवेंद्रचा भाऊ भूषण यानेही संजय पाटील या हवालदारावर तलवारीने वार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणानंतर नगरसेवकासह दोन्ही मुले फरार झाली होती. अखेर तीन दिवसांनंतर आझादनगर पोलिसांनी देवा सोनार, भूषण सोनार यांसह विजय ऊर्फ काळ्या बापू जाधव, बंटी ऊर्फ राकेश रोकडे आणि सचिन बडगुजर यांना अटक केली. दरम्यान, संशयित देवा सोनार हा परिसरात कायमच दहशत पसरवीत असल्याचा आरोप केला जात असून त्याची दहशत संपुष्टात आणण्याची मागणी जुने धुळे भागातील नागरिकांनी तसेच महानगर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.