काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी
जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळू माफिया सागर चौधरी याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे संबंध असून या संपूर्ण प्रकाराची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येवला येथे केली. जळगाव येथेही राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन राजकीय वरदहस्तामुळे वाळू माफियास पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशीची मागणी केली.
जळगाव जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि अलीकडेच निलंबित झालेले पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभाकर रायते व वाळू तस्कर सागर चौधरी या तिघांविरुद्ध नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू तस्करांवर कारवाई केल्यामुळे सादरे हे संबंधितांच्या रडारवर आले होते. वाळू तस्करांनी खोटय़ा तक्रारी करून सादरेंविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात आपले म्हणणे जाणून न घेता एकतर्फी निलंबनाची कारवाई केल्याची बाब खुद्द सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केली आहे. मंगळवारी येवला येथे विखे यांनी उपरोक्त प्रश्नावर महसूलमंत्र्यांवर ताशेरे ओढले. खडसे यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कमी आणि वाळू व महसूल वाढविण्याकडे अधिक लक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या मुद्दय़ावरून त्यांनी जलसंपदामंत्र्यांवर तोफ डागली. जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. नदी व परिसरात १० हजारहून अधिक पंप आहेत. त्यामुळे ते पाणी त्या ठिकाणी पोहोचेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गतवर्षी गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते.

यंदा शेतकऱ्यांनी त्याऐवजी मिरचीचे उत्पादन घेतले. या शेतीची पाहणी विखे यांनी केली. दरम्यान, जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सादरे आत्महत्या प्रकरणावरून पत्रकार परिषद घेऊन संशयित आणि महसूलमंत्री खडसे यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे म्हटले आहे. पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा डॉ. सतीश पाटील यांनी दिला आहे.