पूरक पोषण आहार घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत काढलेल्या ६३०० कोटी रूपयांच्या निविदा औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाने रद्द केल्या होत्या. राज्यातील २३९ प्रकल्पांचे ७० प्रकल्पात एकत्रीकरण केल्यामुळे पंकजा मुंडे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर २०० हून अधिक बचत गटांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकल्पांना घरपोच आहार देण्यासाठी ६ हजार ३०० कोटी रूपयांच्या निविदा काढल्या होत्या. सात वर्षांसाठीच्या या योजनेसाठी प्रत्येक वर्षी या ९०० कोटी खर्चाची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी पंकजा मुंडे चिक्की घोटाळ्यामध्ये वादात अडकल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्तारात जलसंधारण खाते काढून घेतल्याच्या धक्क्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील ट्विटवर वादंगाची चर्चा रंगली होती. चिक्की घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा यांची पाठराखण केली होती. आता राष्ट्रवादीच्या पंकजा मुंडेंची हाकलपट्टी करावी, या मागणीनंतर फडणवीस सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.