गेले पाच वर्षे या भाजपाने शेतकऱ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शेतकऱ्यांच्या नेत्यांना संपवण्यासाठी काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. लातूर येथे मुक्ताई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यादरम्यान मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावरदेखील निशाणा साधला. “आमच्या बहिण काल म्हणाल्या की राष्ट्रवादी संपली. ज्या शहरात तुम्ही राहता तिथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. परळीचा आमदारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल,” असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. “महाराष्ट्राच्या मातीत येऊन भाजपच्या अध्यक्षांनी डंका पिटवू नये. आमच्या दैवताबद्दल एकही वाईट शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. ९३ मध्ये जेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शरद पवार यांनीच दंगली शांत करण्याची जबाबदारी पेलली. तुम्ही तर गुजारातमध्ये दंगली घडविण्याचे काम केले,” असंही ते यावेळी म्हणाले.

“अमित शाह यांनी पुरोगामी महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांचा अपमान केला. मी शपथ घेतो की भाजपचे अविचार या पुरोगामी महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहोत. तुमच्या ईडीची आम्हाला भीती नाही,” असं मुंडे यावेळी म्हणाले. तसंच छत्रपतींच्या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा आहे. “आमच्या छत्रपतींचे वंशज दिल्लीत गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी देशाच्या पंतप्रधानांनी यायला हवे होते. मात्र ज्यांची पत नाही त्यांनी छत्रपतींच्या वारसांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजपा छत्रपतींची अस्मिता पूसून टाकण्याचं पाप करतंय,” असा आरोपदेखील त्यांनी केला.

मुंडे यांनी कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांची स्तुती केली. “शरद पवार आज त्यांच्या जीवा-भावातल्या लातूरला भेट दिली. मला देव माहिती नाही पण देव माणूस मी पाहिला आहे. लातूर आणि शरद पवार यांचे एक वेगळे नाते आहे. लातूरला निसर्ग कोपला. भूकंपामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तेव्हा देवाने या देव माणसाला लातूरमध्ये पाठवले” असल्याचेही ते म्हणाले.