गुरूवारी पूरग्रस्तांना मदतीसाठी जाताना शेअर केलेल्या सेल्फी व्हिडीओनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोत उठली होती. त्यानंतर भाजपा आमदाराचा असाच एक पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली असून त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अशातच भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांनी या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आपला फोटोचे स्टीकर्स लावले आहे. त्यानंतर पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीतही भाजपा सरकार जाहिरातबाजी करत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागल्या आहेत. यातच विधान परिषेदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनीदेखील सरकारवर टीका करत स्टिकर छापत होते म्हणून मदतीला उशीर झाला अशी टीका केली आहे.

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्याने हाहाकार उडवला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. तसेच पुराचे पाणी अजूनही ओसरले नसल्याने सर्वत्रच अन्नधान्याचा तुटवडाही निर्माण झाला आहे. अशातच सरकारने पूरग्रस्तांसाठी 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पाकिटांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर याचे फोटो असलेले स्टिकर्स लावण्यात आले आहे. यावर धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

सरकारची प्राथमिकता स्टिकर छापण्याला आहे का? स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल 2 दिवस मदत दिली नाही. लेकरं-बाळं उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टिकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तत्परता दाखवायची आहे. शोबाजीसाठी लोकांना उपाशी माराल, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून केली आहे.