शिवसेनेने शेतकऱ्यांच्या पिक विम्यासंदर्भात इशारा मोर्चा काढला होता. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिक विमा कंपन्यांना इशारा देत आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका असे सांगत इशारा दिला होता. यावर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना भाजपावर टीका केली. भाजपा, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा असल्याचा टोला त्यांनी यावेळी हाणला.

पिक विमा मोर्चाची सांगत झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यातील सर्व वीमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांची नावे या कंपन्यांनी आणि बँकांना पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला होता. शिवसेनेच्या या मोर्चावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. त्यांनी ट्विटरवरून शिवसेना भाजपावर निशाणा साधला. पिक विम्या संदर्भात सत्ताधारी शिवसेनाच ‘इशारा मोर्चा’ काढत आहे. भाजपा, शिवसेनेचे राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा…एकीकडे मंत्रिमंडळात वाटा मागतात, मांडीला मांडी लावून बसतात मग त्यांच्या यंत्रणेविरोधातच आंदोलन करतात. अरे काय लावलंय यांनी! अशा आशयाचे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याची टीका केली होती. शेतकऱ्यांसाठी शिवसेनेने पिकविमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला आहे. पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील मोर्चामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही या मोर्चात सहभागी झाले आहेत. ही शिवसेनेची नौटकी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.