“मुख्यमंत्री ठरवण्याची तुमची जहागीरी नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्रातील जनतेला आहे,” अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी ही राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. पाच वर्षे काम करण्यात यश न आल्याने जनादेश द्या, हे सांगण्यासाठी महाजनादेश ही यात्रा काढली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ठोस आश्वासन घेवून ही शिवस्वराज्य यात्रा निघाली आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जातीजातीमध्ये तेढ कमी करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आल्याचे कोल्हे म्हणाले. “पारदर्शक कारभाराचे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेवर आलात मात्र पाच वर्षांत काहीच करु शकला नाहीत म्हणूनच तुम्हाला ही महाजनादेश यात्रा काढावी लागली आहे,” असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. “भविष्य साकारण्याची संधी येत्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे. त्याचा विचार करा. भाजपची महाजनादेश, तर शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा जनतेवर लादलेली आहे. मात्र. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मनाने काढण्यात आलेली आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

“भविष्याचे चित्र तरुणांच्या समोर आज स्पष्ट दिसत नाही. जनसामान्यांचा आवाज ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर हवा असेल तर तो आवाज बुलंद करण्यासाठी सज्ज व्हायला हवे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी शिवनेरीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरूवात झाली.