राज्यात सध्या करोनाचा कहर वाढला असताना दुसरीकडे राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये असं ते म्हणाले आहेत. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“महाराष्ट्र राज्याची परंपराच राहिलेली आहे की, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले जसे की किल्लारीचा भूकंप, मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले १६ बॉम्बस्फोट….अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केली. त्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले?; नवाब मलिकांकडून गंभीर आरोप

“राज्य शासनाच्या अख्त्यारित जे काही आहे ते करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे काही मर्यादा आहेत. बेड्स, रेमडेसिवीर, ऑक्सिजन पुरवठा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे,” असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं.

“केंद्र सरकारने निर्यात केली नसती तर रेमडेसिवीरची टंचाई जाणवली नसती. आता निर्यात बंद केली असल्याने तो साठा उपलब्ध होईल. पण आतापर्यंत सरकार आपल्याकडे कमी पडतंय आणि बाहेर पुरवठा करतोय अशी स्थिती होती. त्यामुळे केंद्रानं मदत केली पाहिजे. मदतीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे. जिथं रुग्णसंख्या जास्त आहे तिथे राजकारण बाजूला ठेवून हे करण्याची गरज आहे,” असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

“मला वाटलं देवेंद्र फडणवीस एक उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी चार ते पाच वेळा हे सरकार पडणार असल्याचं सांगितलं आहे. आता तर त्यांनी २ ताऱीख दिली आहे. आता २ तारखेपर्यंत वाट पाहतो, अन्यथा फडणवीसांचा भविष्यकाराचा अभ्यास कमी आहे असं मी समजतो,” असा टोला एकनाथ खडसे यांनी यावेळी लगावला.