News Flash

“गिरीशभाऊंना राजकारणात मी आणलं आहे, म्हणून आज ते इथे दिसतायत”, एकनाथ खडसेंची आगपाखड!

व्हायरल ऑडिओ क्लिपवरून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये वाक्-युद्ध!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची एक ऑडिओ क्लिप आज दिवसभर व्हायरल होत होती. या क्लिपमध्ये खडसेंनी भाजपाचे जळगावमधील आमदार गिरीश महाजन यांच्याबद्दल केलेल्या उल्लेखामुळे गिरीश महाजनांनी खडसेंवर शेलक्या शब्दांमध्ये तोंडसुख घेतलं होतं. त्यावरून आता एकनाथ खडसेंनी तीव्र शब्दांमध्ये आगपाखड केली आहे. “गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं आहे. त्यांच्या अनेक निवडणुकांना आर्थिक मदत मी करत आलो आहे. प्रचाराला मी स्वत: गल्लोगल्ली फिरलो आहे. म्हणून आज गिरीशभाऊ इथे दिसत आहेत. माझा दोष इतकाच आहे की मी कुणाचे पाय चाटले नाहीत आणि कुणाची हांजीहांजी केली नाही. ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो. अनेक लोकं प्रामाणिक राहतात, काही लोकं गद्दारी करतात. असे प्रसंग जीवनात घडत राहतात”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

“मी त्यांना आज ओळखत नाहीये”

दरम्यान, यावेळी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना १९९४-९५मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण देखील करून दिली. “गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाहीये. १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हापासून आजतागायत सगळा इतिहास मला माहितीये आणि सगळ्या जनतेलाही माहिती आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणं काही गैर नाही. मी तरी मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलो. तुम्ही तर तिथपर्यंतही जाऊ शकले नाहीत. हांजीहांजी करून तुम्हाला हे सगळं मिळालं आहे. मला स्वकर्तृत्वाने सगळं मिळालं आहे”, असं देखील एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

सध्या व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एका मुलाचा एका व्यक्तीशी संवाद असून ही व्यक्ती म्हणजे एकनाथ खडसे असल्याची चर्चा आहे. खडसेंसारखाच या व्यक्तीचा आवाज देखील आहे. या मुलाने ऑडिओ क्लिपमध्ये गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर खडसेंनी “बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो”, असं विधान केलं आहे. या मुद्द्यावरून आता जळगावच्या स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

गिरीश महाजन म्हणाले…

गिरीश महाजनांनी यावेळी खडसेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. “त्यांनी अतिशय अश्लील भाषेत प्रतिक्रिया दिली आहे. पण मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं”, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

“खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय”, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून गिरीश महाजनांनी घेतलं तोंडसुख!

“माझं संतुलन बिघडलेलं नाही”

यावरून देखील एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना प्रत्युत्तर दिलं आहे. “माझं संतुलन वगैरे काहीही बिघडलेलं नाही. त्या मतदारसंघातून मला गेल्या आठवड्याभरात तक्रारी आणि अडचणींचे खूप फोन आले. इंजेक्शन मिळत नाहीत, हॉस्पिटलमधून पैशांशिवाय मृतदेह देत नाहीत अशा तक्रारी माझ्याकडे लोकांनी केल्या आहेत. इकडे लोकांचे मुडदे पडत होते आणि त्याच काळात गिरीशभाऊ महिनाभर पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. त्यासंदर्भात लोकांचा संताप ते माझ्याकडे व्यक्त करायचे. त्यावर मी बोललो”, असं खडसे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 10:43 pm

Web Title: ncp eknath khadse viral audio clip slams bjp girish mahajan pmw 88
Next Stories
1 Maharashtra Corona Update : २४ तासांत राज्यात ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ नवे करोनाबाधित!
2 “खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय”, ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून गिरीश महाजनांनी घेतलं तोंडसुख!
3 लॉकडाउन वाढणारच; पण किती ते ३० एप्रिलला कळेल! आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती!
Just Now!
X