राज्यातील गृह विभाग अर्थात पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत आहे. राजकीय हस्तक्षेपाच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण होत आहे, असा आरोप युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला. गुरुवारी येथे युवक काँग्रेसच्या नाशिक विभागीय मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे कार्यकर्ते हे देशातील सर्वसामान्य नागरिकांचे शिपाई आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेगवेगळ्या स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ते वारंवार आंदोलने वा मोर्चाचे आयोजन करीत असतात. अशा आंदोलनावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून वेठीस धरले जाते. अर्थात, हा विभाग असे काम करण्यामागे राष्ट्रवादीचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची टीकाही तांबे यांनी केली. गृह विभाग राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करतो. गेल्या काही वर्षांत या विभागाच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर या विभागाचे काम चालते. या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे धोरण राष्ट्रवादी राबवित असल्याचा आरोप तांबे यांनी केला. दरम्यान, पत्रकार परिषदेपूर्वी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी या मुद्यावर आपल्या व्यथा मांडल्या होत्या. तो धागा पकडून तांबे यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढविल्याचे सांगितले जाते.