चिपळूण : लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे .

रायगडमध्ये शेकापने मागील निवडणूकीत स्वतंत्र उमदेवार दिला होता. मोदी लाट असतानाही शिवसेनेचे अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा काठावर पराभव केला. यावेळी शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला पािठबा दिला आहे. सहा वेळा लोकसभेत निवडून गेलेले विद्यमान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी खासदार निधी संपवण्यापलिकडे फारसे काम केले नाही. शिवसेनेचा एकमेव मंत्री म्हणून त्यांना प्रभाव पाडता आला नाही.

दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तटकरेंनी वातावरण निर्मिती सुरू केली. कबड्डी वर्षेच्या माध्यमातून आघाडतील सर्वच नेत्यांना एका व्यासपीठावर आणून योग्य तो संदेश दिले. शिवसेनेतील नाराजांच्या भेटी घेतल्या. त्याला उत्तर म्हणून गीतेंनी काँग्रेसमधील तटकरेविरोधी पदाधिकार्याच्या भेटी घेतल्या. दोघे एकमेकांवर कुरघोडी करत असताना भाजपने काँग्रेस नेते रवीशेठ पाटील यांचा पक्षप्रवेश करून घेतला. युती झाली नाही तर स्वतंत्र उमेदवार देऊन शिवसेनेची विजयाची गणिते मोडण्याची व्यूहरचना भाजपमध्ये सुरू होती, तर भाजपचा छुपा पाठींबा मिळवण्यासाठी तटकरेंकडून प्रयत्न सुरू होते. शिवाय, निवडणुकांच्या राजकारणाची सर्व तंत्रे तटकरेंना अवगत असल्यामुळे गीते यांच्यासाठी युतीविना निवडणूक फारच अवघड होती. पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला युती झाल्यामुळे गीतेंना दिलासा मिळाला आहे. देशात पुन्हा भाजपची सत्ता येण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार निवडून येणे ही भाजपची गरज आहे. त्यामुळे गीतेंना क्रॉस व्होटींगचा फटका बसण्याचीही शक्यता कमी आहे. पण मनसेचा पािठबा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता असल्याने निवडणूक रंगणार आहे .