जायकवाडीत पाणी सोडल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा मराठवाडय़ात उजळून निघाली, तर खमकेपणा दाखवल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयक्षमतेबद्दलचा प्रश्न निकाली निघाला. असे असले तरी नगर व नाशिक जिल्ह्य़ातील शेतकरी वर्ग भर हिवाळ्यात होरपळला. त्याच्या राजकीय झळा बसण्याचा धोका ओळखून राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने नेत्यांना चुचकारले. आता आवर्तनाचे श्रेय मिळून पक्षप्रतिमा उजळविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
मुळा, भंडारदरा, निळवंडे व दारणा धरणांतील नऊ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले तसे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या काळजात कालवाकालव झाली. राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते सरकारला अनुकूल भूमिका घेत पाणी आडवायच्या भानगडीत पडले नाहीत. पण राहुरी व श्रीरामपूरला शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याने पक्षभेद विसरून सारे एकत्र आले. मोर्चे व रास्ता रोको झाले. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही सहभागी व्हावे लागले. लोकांच्या सुरात सूर त्यांनी मिळविला. आगामी विधानसभा व सहकाराच्या निवडणुकीवर त्याची छाया पडू नये असे डावपेच त्यांना खेळणे भाग पडत आहे.
 राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत नगर जिल्ह्य़ातील पक्षाच्या पाणीप्रश्नाशी संबंधित असलेल्या दिग्गज नेत्यांना बोलावून चर्चा केली. त्यांची जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याबरोबर भेट घडवून आणली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार शंकर गडाख, चंद्रशेखर घुले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे हे पवार व तटकरेंना भेटले. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले नेते आमदार शिवाजी कर्डिले हेदेखील या वेळी उपस्थित होते.
 मात्र, काँग्रेसच्या नेत्यांना बैठकीपासून बाजूला ठेवण्यात आले होते. जायकवाडीत पाणी गेल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा गढूळ होऊ नये म्हणून आता आवर्तनाची मलमपट्टी देण्याचे या वेळी ठरले.
जायकवाडीत नऊ टीएमसी पाणी गेले. अद्याप आवर्तनाचा निर्णय नाही. पण, पुढे पुन्हा आणखी पाणी मराठवाडय़ात गेले तर शेती व उद्योग उद्ध्वस्त होतील. शेतकऱ्यांमध्ये तशी भीती आहे. याचा एकदा सोक्षमोक्ष लावला नाही, तर राष्ट्रवादी व काँग्रेसला अडचण होईल असे नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. आता यापुढे नगर व नाशिक जिल्ह्य़ातील धरणात असलेले पाणी जायकवाडीत सोडायचा प्रस्ताव नाही, तसे होणार नाही, असे आश्वासन पवार व मंत्री तटकरे यांनी दिल्याचे समजते.
जायकवाडीत पुन्हा पाणी मागितले गेले तर मात्र, पक्षाला अडचणीचे ठरेल. तसेच, लोकांच्या प्रश्नाबरोबर नेत्यांना राहावे लागेल. त्यासाठी त्वरित आवर्तनाचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. पण आता जायकवाडीला नऊ टीएमसी पाणी पोहोचल्यानंतरच आवर्तनाचा निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. जलसंपदामंत्री तटकरे हे कालवा सल्लागार समितीच्या बैठका स्वत: घेणार असून त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. मुळा धरणातून एक आवर्तन केले जाणार असून त्यासाठी मृत पाणीसाठय़ातून दोन ते तीन टीएमसी पाणी वापरायला परवानगी देण्याचे सूतोवाच या वेळी पवार व तटकरे यांनी केले. सध्या जायकवाडीसाठी मुळा, प्रवरा व गोदावरी नदीतून पाणी वाहते आहे. त्याने राजकारणही ढवळून निघाले असून आंदोलनाचा पूर आला आहे. भर हिवाळ्यात त्याचे चटके बसू नये म्हणून राष्ट्रवादीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.