28 November 2020

News Flash

राष्ट्रवादीचा खंडणीखोर सरचिटणीस अटकेत

जिवे मारण्याची धमकी देऊन दीड लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सावंत याला जवाहरनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

| January 10, 2015 01:49 am

जिवे मारण्याची धमकी देऊन दीड लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब सावंत याला जवाहरनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. सावंत व त्याच्या साथीदाराने ‘३ लाख रुपये दिले नाही, तर ठार करण्याची धमकी दिल्याची’ तक्रार कैलास साळुंके यांनी दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

वैजापूर तालुक्यातील शिरजगाव येथील गट क्र. ५९मधील जमीनतक्रारदार साळुंके यांनी सावंत याच्या भावाच्या मध्यस्थीने घेतली होती, तसेच गंगापूर येथील सावंत याच्या मालकीचे हॉटेल साळुंके यांच्या तीन मित्रांनी भागीदारीत चालविण्यास घेतले होते. याशिवाय त्यांचा सावंत याच्याशी कसलाही संबंध नाही. मात्र, तरीही कोणत्याही कारणाशिवाय गेल्या २० डिसेंबरला सावंत व एका गुंडाने आमदार सतीश चव्हाण यांच्या घराजवळ अडवून तीन लाख रुपयांची मागणी केली. ही घटना सकाळी दहा ते साडेदहाच्या दरम्यान घडली, असे साळुंके यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
चिकलठाण्यातील साळुंके यांच्या पुतण्याकडून दीड लाखाची रक्कम उकळली. त्यानंतर ६ जानेवारीला उर्वरित १ लाख ५० हजार रुपये आणून द्या, असा दूरध्वनी केला. कोणत्या क्रमांकावरून हा दूरध्वनी केला, त्याचा तपशील साळुंके यांनी पोलिसांकडे दिला आहे. २० डिसेंबरला अर्धी रक्कम घाबरून दिली होती. उर्वरित रक्कम मिळावी, असा तगादा सुरू झाल्याने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे. त्यानुसार सावंत यास पोलिसांनी अटक केली.
या अनुषंगाने बोलताना पोलीस उपायुक्त अरिवद चावरिया यांनी सांगितले, की पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे. मात्र, अन्य काही जणांना धमकावले आहे काय, याची तपासणी सुरू आहे. अशा काही तक्रारी असल्यास जनतेनेही पुढे यावे. दरम्यान, खंडणीच्या या गुन्ह्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:49 am

Web Title: ncp general secretary arrest
टॅग Arrest
Next Stories
1 ‘डॉल्बी’ बंद करण्यावरून गुंडांचा पोलिसांवर हल्ला
2 वेगळय़ा विदर्भाची मागणी सयुक्तिक नाही- डॉ. मोरे
3 मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात
Just Now!
X