अलिबाग :  पुरोगामी विचारसरणीच्या पक्षांचे एकत्रीकरण आणि शिवसेना भाजप यांच्या मताचे विभाजन याचा कोकण पदवीधर मतदारसंघातून आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ते अलिबाग येथील पिएनपी नाट्यगृहात नजीब मुल्ला यांच्या प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते. निरंजन डावखरे गेल्या सहा वर्षांत मतदारसंघात प्रभाव पाडण्यात सपशेल अपयशी ठरले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २५ जुनला निवडणुक होत आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष यासारख्या पुरोगामी विचारांच्या पक्षांचा तसेच संघटनांनी पाठिबा जाहिर केला आहे.

दुसरीकडे शिवसेना आणि भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या मतविभाजनाचा फायदा मुल्ला यांना होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निवडणूकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पण याचा पक्षाच्या मतांवर फारसा परीणाम होणार नाही, कारण गेल्या सहा वर्षांत त्यांची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे मतदारसंघावर आपली छाप सोडण्यात ते अपयशी ठरले. शिवसेना आणि भाजप राज्यात सत्तेत आहे. मात्र दोघामध्ये प्रचंड विंसवाद आहे. या निवडणूकीच्या निमित्याने हा विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचा फायदा आमच्या उमेदवाराला होईल असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.

दरम्यान विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघापाठोपाठ कोकणातील पदवीधर मतदरासंघातही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकाप आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून पदवीधर मतदारांच्या नोंदणीसाठी शेकापने प्रयत्न केले.

जवळपास १९ हजार मतदारांची नोदंणी करता आली. याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होईल. शिवसेना आणि भाजपच्या मतविभाजनाचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला मिळेल असा आशावादही शेकापच्या जयंत पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी आमदार सुभाष पाटील, माजी आमदार मिनाक्षी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते.