काँग्रेस पक्षानेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले. गेल्या पाच वर्षात काँग्रेसबरोबर राहिल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान झाले, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. ते सोमवारी अकोल्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी बदनाम करण्यासाठी प्रयत्न केले. चव्हाण यांनीच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले, असा आरोप पटेल यांनी केला. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता काँग्रेसमध्ये काहीच उरलेले नाही. देशातील आणि राज्यातील काँग्रेसचे वर्चस्व संपले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस स्वत:ही बुडाली आणि आम्हालाही घेऊन बुडाली. मात्र, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने भरारी घेईल, असा आशावाद यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या या टीकेमुळे आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दरी आणखीनच रूंदाविण्याची शक्यता आहे. विरोधी बाकांवर बसूनही दोन्ही पक्षांमधील नेत्यांची परस्परांवर कुरघोडी करण्याची वृत्ती अजूनही कायम आहे. त्यामुळेच विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान अनेकदा दोन्ही पक्षांकडून आक्रमक पवित्रा घेत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न होताना दिसतात.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेसने आमची बदनामी करण्यातच धन्यता मानली. आमचे सरकार असताना काँग्रेस पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसलाच जास्त लक्ष्य करत होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्या पक्षाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले होते. अनेक घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाहक गोवण्यात आले, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.