वारंवार सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिमटा काढला आहे. मी शिवसेनेकडे जाताना गाढव घेऊन जाणार आहे. गाढव कशी लाथ मारतो हे त्यांना दाखवणार असून यामुळे शिवसेना सत्तेला लाथ कशी मारायची हे शिकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर सभा घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा व शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी जशी गाय घेऊन जाणार आहे, तसंच शिवसेनेकडे एक गाढव घेऊन जाणार आहे. हे दाखवायला की गाढव कशी लाथ मारतो. म्हणजे शिवसेना सत्तेला लाथ कशी मारावी लागते हे शिकेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपा, मोदी आणि त्यांची आश्वासने आता चौकाचौकात चेष्टेचा विषय बनली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, नीरव मोदी हजारो कोटी घेऊन पळाले, त्यातले काही चौकीदाराला मिळाले की काय ? म्हणूनच पंतप्रधान यावर अजून काहीच बोलले नाही, असा आरोपच त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,  राज्यात सध्या संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाही, अशी तक्रार महिला करत आहेत. राज्यात आघाडी सरकार असताना ही योजना सुरळीत सुरू होती. आता पुन्हा सत्ता आल्यावर एक दिवस आधीच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळवून देवू, असे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून घेत होते. आता या चौकीदाराला बदलण्याची वेळ आहे. देशात चोऱ्या होत असताना अशा चौकीदाराचा काय उपयोग, असे त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या कापसावर जशी बोंडअळी आली तशी बोंडअळी सेना-भाजप सरकारवर आणा आणि शेतकऱ्यांच्याविरोधात असलेल्या सरकारला खाली खेचा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील हल्लाबोलचा बुधवारी शेवटचा दिवस होता.