आघाडी तोडून सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट आली. राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या राज्याच्या चाव्या काही दिवसांसाठी का होईना मोदींकडे सुपूर्द केल्या. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात साटेलोटे असल्यानेच अशा पद्धतीचे निर्णय घेतले गेले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
येथील जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या मैदानात रविवारी काँग्रेसचे उमेदवार कुणाल वसावे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत चव्हाण हे मोदी आणि राष्ट्रवादीवर चांगलेच बरसले. १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची वल्गना करणारे मोदी १०० रुपयेही आणू शकले नाहीत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा प्रश्न उपस्थित करत पालघरमध्ये मंजूर असलेली सागरी सुरक्षा अकादमी गुजरातमधील द्वारका येथे नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. विजयादशमीच्या दिवशी दूरदर्शनवरुन सरसघंचालकांचे भाषण थेट प्रक्षेपित केल्याबद्दल टीकास्त्र सोडताना चव्हाण यांनी मोदी आणि भाजपचा भारतातील संपूर्ण सत्ताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात देण्याचा घाट असल्याचा आरोप केला.