केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोकणात महाविकासआघाडी बाबत केलेलं वक्तव्य हे वैफल्यातून आलं आहे. भाजपा राज्यात सत्तेवर येणार नसल्याचे समजल्यामुळे आता तक्रारी करत आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली. सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अमित शाह यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली होती. सत्तेत येण्यासाठी शिवसेनेला कोणताही शब्द दिला नव्हता असंही ते म्हणाले. यावर मुश्रीफ यांनी भाजपाने ठाकरे यांना सत्तेबाबत दिलेला शब्द खरा असावा, अशी शक्यता मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

मुश्रीफ यांनी प्रामुख्याने अमित शाह यांनी साखर उद्योगासंदर्भात केलेल्या टीकेवर राज्य शासनाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “अमित शाह यांना भाजपच्या लोकांनी चुकीची माहिती दिलेली आहे. राज्य शासनाने साखर कारखान्यांना थकहमी देताना पक्षपाती भूमिका घेतली नाही. सर्व पात्र साखर कारखान्यांना थकहमी दिलेली आहे. शाह यांनी नमूद केल्याप्रमाणे तक्रार करणारा कोणी कारखानदार असेल तर त्याचं नाव सांगावं. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर कोणतीही शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. ज्या साखर कारखानदारांनी शाह यांच्याकडे तक्रार केली असेल त्यांनाच केंद्र शासनाकडून अर्थसाह्य हवे असेल”.

“गेल्या वर्षभरापासून भाजपाने सातत्याने वेगवेगळी वक्तव्य करून महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकार पाडण्याचे धाडस कोणी करणार नाही. जो असा प्रयत्न करेल त्याची अनामत रक्कम निवडणुकीत जप्त होईल,” असंही मुश्रीफ म्हणाले.