नवीन कृषी कायदे रद्द होणार नसल्याची वल्गना करणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत काय? असा प्रश्न ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होत. “शेतकरी आंदोलनावरून भावना तीव्र झाल्या असताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये,” असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

आणखी वाचा- झोपेचं सोंग घेतलेल्या मोदी सरकारला जागं करण्यासाठी ‘भारत बंद’ महत्त्वाचा!

“केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने नवी दिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. नव्या विधेयकानुसार करार शेती अस्तित्वात येणार असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल. त्यांच्या जमिनी कवडीमोलाने विकल्या जातील,” असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला. “शेतकरी हिताची पोकळ भाषा भाजपा कर आहे. राज्यात फडणवीस काळात सुरू झालेले सावता माळी बाजार कोठे गेले,” अशी विचारणा त्यांनी केली.

आणखी वाचा- शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीने दिलं स्पष्टीकरण, सांगितलं की…

नोव्हेंबर २०११ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यांना खासगी कृषी समित्यांना प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिले होते. याकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ यांनी अधिक बोलण्याचे टाळत यावर शरद पवार हेच भाष्य करतील, असे सांगितले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना यांनी घेतला आहे. त्यासाठी ८ डिसेंबरचा बंद शांततेत आणि कडकडीतपणे पाळावा, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.