तालुक्यातील जवळपास वीस गावांच्या संपर्काचा रस्ता असलेल्या पेडगाव येथील रेल्वे भुयारी पुलाखालील जागेस सध्या तलावाचे स्वरूप आले असून या मार्गावरून होणारी वाहतूक थांबल्याने अनेक गावांच्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर साचलेल्या पाण्यात उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात ग्रामस्थ मोठय़ा संख्येने हजर होते. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून रहदारीसाठी रेल्वे भुयारी पुलाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षीच मोठा पाऊस झाल्यानंतर या पुलाखाली पाणी साचते व त्याला तलावाचे स्वरूप येते. अशावेळी गव्हा, मोहपुरी, आळंद अशा १५ ते २० गावांचा संपर्क बंद होतो. या गावातल्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना रहदारीसाठी रस्ताच नसल्याने ही गावे संपर्कापासूनच तुटली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात प्रभाकर गव्हाणे, श्रीधर पाते, नवनाथ मेटे, हरिभाऊ खरात, शिवाजी खरात आदींसह अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. पाथरीचे नवनिर्वाचित आमदार सुरेश वरपूडकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यांनाही यावेळी निवेदन सादर करण्यात आले.