17 December 2017

News Flash

राष्ट्रवादी काँग्रेस लाचार नाही

महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल सज्जड

वार्ताहर, राहाता | Updated: January 2, 2013 5:12 AM

महाराष्ट्रातील दोन्ही काँग्रेसच्या आघाडीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल सज्जड इशारा दिल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही आज शिर्डीत त्याचीच दुरुक्ती केली. २०१४ च्या निवडणुका आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढवू इच्छितो असे नाही, पण ते स्वबळावर लढविण्याची भाषा करीत असतील तर आम्ही लाचार नाही. स्वबळावर लढू, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विकास झपाटय़ाने सुरू असल्याने सांगून, राज्य सरकारला घरचा आहेर देणाऱ्या पटेल यांनी राज्यात खूप कामांची गरज असून, राज्यात आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त करताना विकासासाठी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले.
नववर्षांची सुरुवात साईदर्शनाने करण्यासाठी शिर्डीत आलेल्या पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्षांत सुरू असलेली धुसफूस चव्हाटय़ावर आणली. प्रत्येक कार्यक्रमात काँग्रेसचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहेत. काँग्रेसबरोबर राहणे ही काय आमची लाचारी नाही. जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. राष्ट्रवादी ही काही लेचीपेची नाही. राज्यात आमचा चांगला प्रभाव असून, आम्हीही सर्व जागा स्वबळावर लढू शकतो, असा दावा पटेल यांनी केला. गुजरातच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे करून, काँग्रेसने समझोता न पाळता विश्वासघात केल्याचा आरोप पटेल यांनी केला. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा विकास झपाटय़ाने होत असल्याचे सांगून पटेल यांनी राज्य सरकार पायाभूत सुविधा उभारण्यात कमी पडत असल्याचे मान्य केले. दोन्ही पक्षांनी एकविचाराने काम केले, तर नक्कीच काम होईल. राज्यात विकास झाला असला, तरी बरीच कामे करावी लागतील. त्यासाठी सरकारचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, आम्ही सहयोगी आहोत. आम्ही कामांना कोठे विरोध करतो, असा सवालही त्यांनी केला.
दिल्लीत सामूहिक बलात्कार प्रकरणाची िनदा करून त्यांनी या प्रश्नी राजकारण न करता सर्वानी मिळून कठोर कायदा करण्याची आवश्यकता व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादीचे बिपिन कोल्हे, डॉ. राजेंद्र पिपाडा, रमेश गोंदकर आदी उपस्थित होते.

First Published on January 2, 2013 5:12 am

Web Title: ncp is not wick
टॅग Ncp,Patel,Political